भाग १५: तुमची भन्नाट कल्पना

Mode: MIND!
Computer Skills needed: Depends
Investment : Needed
Period to learn and master: Varies

आतापर्यंत मी तुम्हाला अनेक ऑनलाईन आणि ऑफ लाईन उत्पन्नाचे, व्यवसायाचे प्रकार सांगितले. ते तुम्ही वापरताही असाल. आज, तुमच्याच जवळ असलेल्या सर्वशक्तिमान मनाचा वापर करून, तुमची कोणती भन्नाट व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात आणता येते का त्याचा विचार करा. मी तुम्हाला काही मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन करतो.

 लोकांचा वेळ, पैसा, मेहेनत वाचविणारी एखादी सेवा किंवा उत्पादन तुम्ही जगाला देता, किंवा त्यांच्या एखाद्या समस्येला उपाय शोधून देता, ती तुमची भन्नाट कल्पना, एक मोठा व्यवसाय उभा करू शकते.

विचार करा, आता आजूबाजूला दिसणाऱ्या सर्व सुविधा अशाच आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत. गरज ही शोधाची जननी असते, असे म्हणतात, ते या अर्थाने. सर्व उत्पादक यत्रे, गाड्या, फोन, टीव्ही, यंत्र मानव, अंतराळ यान, औषधे, वस्त्र प्रावरणे, खाद्य पदार्थ, संगणक, मोबाईल, सिनेमा ... सगळी काही ह्याचीच उदाहरणे आहेत.

  तुम्ही शोध लावल्यावर शास्त्रज्ञ बनता, शास्त्रज्ञ बनल्यावर शोध लावत नाही. तुमच्या कल्पना शक्तीला कमी लेखू नका. ५०-१०० वर्षापूर्वी ज्यांनी शोध लावले त्यातील कोणताही व्यक्ती आजच्या अर्थाने इंजिनिअर, डॉक्टर नव्हता, ह्याचा विचार करा. आजच्या एवढी माहितीची आणि संपर्काची साधने तेव्हा नव्हती, होती ती फक्त भन्नाट कल्पना आणि ती प्रत्यक्षात उतरण्याची चिकाटी! आणि, ह्या गोष्टी आपणही निर्धाराने वापरू शकतो. ह्यामध्ये तुमचं वय, शिक्षण, ज्ञान, भाषा, समाज, लिंग, आर्थिक स्थिती वगैरे कशाचीही अडचण नाही.

  आता, लिहायला एक वही करून, खालील प्रश्नावर विचार करा, कल्पना व त्यासंबंधित खालील प्रश्न स्वतःला विचारा, आणि उत्तरे, मिळालेली माहिती, आराखडे, आकडेमोड, वगैरे सगळे लिहून ठेवा.

१. तुम्ही लोकांचा कोणता प्रश्न, समस्या सोडवू इच्छिता, शकता? कशी?
२. त्यासाठी कोणती प्रणाली, पद्धत, यंत्र विकसित करावे लागेल?
३. त्यासाठी भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्य बळ, जागा अशी कोणती साधने लागतील?
४. वरील गोष्टी तुम्ही कशा मिळवाल? त्यासाठी, तुम्ही तुमची कल्पना लोकांना कधी पटवून देऊ शकाल?
५. तुमची कल्पना आणि ती प्रत्यक्षात आणण्याचे काम कसे करणार? त्याचे स्वरूप काय? प्रकल्प आराखडा बनवा.
६. ह्यासाठी ग्राहक कोण व किती आहेत? त्यांना तुम्ही बनवत असलेल्या उत्पादनाने कसा लाभ होईल?
७. तुमच्या उत्पादन / सेवेची बनवण्याचा खर्च किती होईल, विक्री किँमत काय असेल? नफा किती होईल?
८. उत्पादन, सेवा गावात, देशात, जगात कशी वितरित कराल?
..... आणि इतर संबंधित प्रश्न, विचार, माहिती!

लक्षात ठेवा, योग्य कल्पना आणि उत्पादनं विकसित करण्यासाठी भांडवलाची कमतरता नाही. तुमच्या मनातील कल्पना किती स्पष्ट आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही किती तयार आहात, ते महत्वाचे! कल्पना तुमच्या गाव , देश किंवा पूर्ण जगासाठी सुध्दा असेल, सुरुवात तर करा! आज कोरोना लशीचे शोध काम पूर्ण जगासाठी चालू आहे, हे ह्याचे ताजे उदाहरण आहे. तुम्ही सुद्धा छोटा - मोठा प्रश्न, समस्या सोडवायला घ्या!

तर, मनात कल्पना अनेक येतात आणि हवेत निघून जातात. पण, गोंधळून जाऊ नका. तुम्ही तुम्हाला भावणाऱ्या २-३ कल्पना निवडा, निश्चित करा, त्यामधील एक एक कल्पनेवर काम, विश्लेषण, विचार करून, कोणती पुढे न्यायची ते ठरवा. आणि, ती प्रत्यक्षात येईपर्यंत थांबू नका.

  करताय ना सुरुवात, "मनातून" आणि वही - पेन घेऊन ?

चर्चा करण्यासाठी माझ्याशी बोलू शकता.


लेखक श्री सतीश रानडे, हे मुंबई येथील माहिती तंत्रज्ञान उद्योजक आहेत. सर्वांशी फोनवर बोलणे शक्य नसल्याने, तुमच्या शंका प्रश्न, सूचना त्यांच्या व्हॉटसअप क्रमांक 9820344725 वर, "SSSBIZ" च्या संदर्भासहित, तुमचं आणि गाव, जिल्ह्याचे नाव ह्या सह पाठवणे. उत्तर मिळेल. आणि त्यांचं नाव, नंबर सेव्ह करावा.